ड्रग्ज माफियांच्या मालमत्तांवर चालणार बुलडोजर

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : ड्रग्ज माफियांविरोधात पोलिस आता बुलडोझर पॅटर्नची कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. जिन्सी परिसरातील अमली पदार्थ विकणारा अश्फाक पटेल याच्या संपर्कातील १७ जणांना अटक केल्यानंतर त्यांच्या बेकायदा मालमत्तांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. गुन्हे शाखेकडून संबंधित आरोपींच्या मालमत्तांची माहिती संकलित करून महापालिकेकडे प्रस्ताव पाठविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने अलीकडेच मोठी कारवाई करत ड्रग्ज सिंडिकेटचा भंडाफोड केला. केवळ अटक नव्हे तर समूळ उच्चाटन हा आदेश गुन्हे शाखेला देण्यात आला. तपासात उघड झाल्यानुसार, ड्रग्ज विक्रीतून कमावलेल्या पैशातून आरोपींनी अतिक्रमित किंवा नियमबाह्य बांधकामे उभी केली. अशा सर्व बांधकामांची माहिती घेतली जात आहे. महापालिकेच्या मदतीने ती जमीनदोस्त करण्याची तयारी आहे. जिन्सी आणि सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने अमली पदार्थांची साखळी उभी केली होती. 
तपासात अनेक आरोपींच्या घरातूनच साठवणूक आणि विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्हेगारीचा आर्थिक पुरवठा खंडित करण्यासाठी थेट मालमत्तांवर कारवाई करण्याची रणनीती आखली आहे. पोलिसांकडून मोक्का आणि एमपीडीए अंतर्गत कारवायांसोबतच बुलडोझर अ‍ॅक्शनचा दुहेरी दणका देण्यात येणार असल्याने आरोपींमध्ये भीतीचे वातावरण आहे.